

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार)-: स्वच्छ भारत अभियान – स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा स्पर्धा अनुषंगाने विटा शहरातील स्वच्छतेची गुणवत्ता वाढवण्यासाठी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर,नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्य विभागाचे आयईसी डिपार्टमेंट कार्यरत आहे.
शहरातील स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी विटा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे यांनी आयईसी (Information, Education and Communication) विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी विभागाच्या दैनंदिन कामकाजाची पाहणी करत विविध उपक्रमांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
या आढावा बैठकीत शहरातील दैनंदिन स्वच्छता मोहिमा, प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी, तसेच “गुडमॉर्निंग पथक” द्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर विशेष चर्चा करण्यात आली. प्लास्टिकमुक्त विटा घडविण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती घेताना सभापती भालचंद्र कांबळे यांनी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. व्यापारी, नागरिक आणि विविध संस्थांच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक बंदी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
“गुडमॉर्निंग पथक” शहरातील स्वच्छता जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून सकाळच्या व रात्रीच्या वेळेत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. याचबरोबर, उघड्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा वापर करणे यासारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकाने अधिक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
आयईसी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमा, शाळा-स्तरावरील उपक्रम, हॉटेल, मेडिकल, मंगलकार्यालये, चिकन मटण शॉप इत्यादी व्यावसायिक व नागरिकांशी थेट संवाद साधून माहिती संकलित करणे, तसेच अपार्टमेंट सर्व्ह करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विविध सोशल माध्यमांद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचवणे, नागरिकांच्या तक्रारी निवारण साठी टोलफ्री नंबर चे ऑपरेटिंग करणे, घंटागाडी चे व्यवस्थापन व कार्यान्वित सुपरवायझर यांच्या कामावर लक्ष देणे तसेच कामाचेही परीक्षण करणे अश्या सूचना आयईसी विभागाला दिल्या आहेत स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहराचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक घटकाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता ठेवण्याचे निर्देश दिले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक सवयी निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीस आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळे, नगरसेवक अविनाश शितोळे, प्रभारी आरोग्य निरीक्षक संदीप वाघमारे, आयईसी विभाग प्रमुख नितीन चंदनशिवे, सुपरवायझर अभि गायगवळे, समन्वयक प्रमोद भोसले, सुरज मंडले, महेश झाडे, आकाश कदम, बुद्धिवान आंबवडे, विजय चंदनशिवे, अभिजित ममदापुरे, साक्षी सगरे, मंगल साळूंखे, भाग्यश्री शिंदे यांचेसह संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच आयईसी विभागातील समन्वयक उपस्थित होते.
शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.