दर्पण न्यूज मिरज / सांगली : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund – AIF) योजनेंतर्गत देशभरात दि. 19 जून 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश पीक काढणीनंतरच्या (Post-Harvest) कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजूर होणाऱ्या कर्जावर रु. 2 कोटीपर्यंतच्या कर्जासाठी 3 टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेंतर्गत पात्र प्रकल्पांमध्ये गोदामे, शीतगृहे (कोल्ड स्टोरेज), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.
योजनेसाठी पात्र लाभार्थी – वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट (SHGs), कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्था.
या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यात व्यापक जनजागृती, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र शेतकरी व संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक व इतर लाभार्थींनी कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घेऊन https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी संचालक, आत्मा, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.