दर्पण न्यूज पलूस /सांगली (अभिजीत रांजणे): कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सांगली पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांगली पाटबंधारे विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दि. 9 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता कृष्णा नदीवरील आयर्विन पुल येथे पाणीपातळी 26 फूट 9 इंच इतकी आहे. दि. 8 जुलैच्या रात्री मुक्त पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पुलावरील पाणीपातळीत आणखी वाढ होऊन दि. 9 जुलैच्या रात्रीपर्यंत ती अंदाजे 30 ते 32 फूटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाशी 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.52 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 49.75 (105.25), धोम 7.99 (13.50), कन्हेर 8.18 (10.10), धोम बलकवडी 2.98 (4.08), उरमोडी 5.61 (9.97), तारळी 2.82 (5.85), वारणा 19.52 (34.40), राधानगरी 4.90 (8.36), दूधगंगा 7.13 (25.40), तुळशी 1.90 (3.47), कासारी 1.45 (2.77), पाटगांव 1.72 (3.72), अलमट्टी 44.70 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 640, उरमोडी 10, तारळी 100, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 483 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 26.9 (40) व अंकली पूल हरिपूर 29.10 (45.11).
वाळवा तालुक्यात 46.2 मि.मी. पावसाची नोंद
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 23.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा तालुक्यात सर्वाधिक 46.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 23.1 (169.4), जत 6.9 (128.5), खानापूर 10.1 (187.3), वाळवा 46.2 (259.6), तासगाव 15.4 (193.9), शिराळा 33.4 (482.3), आटपाडी 1.6 (150.1), कवठेमहांकाळ 12 (108.6), पलूस 31 (175), कडेगाव 25.6 (194.8).