दर्पण न्यूज भिलवडी/धनगाव : कृषी दिनाचे औचित्य साधत धनगावचे प्रगतिशील शेतकरी व सेंद्रिय शेतीचे अभ्यासू मार्गदर्शक सुनील विष्णू भोसले यांना सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेंद्रिय शेतीचा प्रसार, विषमुक्त अन्ननिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी हितासाठी केलेल्या अविरत कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा या मानाच्या पुरस्काराने गौरव केला. आपल्या ज्ञान, अनुभव आणि निःस्वार्थ मार्गदर्शनातून त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना नैसर्गिक व शाश्वत शेतीची दिशा दिली असून सेंद्रिय शेती चळवळ अधिक बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास महामहीम राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्ता भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह आणि कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुनील विष्णू भोसले यांच्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल धनगावसह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कृषी दिनी मिळालेला हा ‘कृषिभूषण’ पुरस्कार सेंद्रिय शेती क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकरी व युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
*आर्यवेद* व *शेतकरी माझा* या ब्रँड द्वारे शहरातील ग्राहकांना घरपोच विक्री तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकरी, महिला व युवा यांना सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन ….!
*परसबागेसाठी आग्रह*
शेतकरी व घराभोवती थोडीबहुत जागा असणाऱ्यांसाठी परसबागेचे आदर्श मॉडेल तयार केले . आपल्या दैनंदिन विषमुक्त भाजीपाला मिळवण्यासाठी परसबागेचा आग्रह….