सांगली येथे रविवारी अमृत पेठ थेट बाजार पेठ प्रदर्शन

दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत व बि बि एन असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने रविवार, दिनांक 15 मार्च 2026 रोजी ऋतुरंग हॉल, 100 फूटी रोड, विश्रामबाग गणपती मंदिराजवळ, सांगली येथे जिल्ह्यातील अमृतच्या लक्षित गटातील व्यवसायिकांसाठी अमृत पेठ थेट बाजारपेठ या एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा व आपल्या सह समाजाचा उत्कर्ष साधावा, असे आवाहन अमृत चे जिल्हा व्यवस्थापक शैलेन्द्र जहागिरदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अशा जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही, अशा जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. अमृत प्रामुख्याने नवीन उद्योजकाना प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन उद्योग उभे करण्याचे काम करते. तसेच छोट्या उद्योजकांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी मदत करत असते. याचाच एक भाग म्हणून अमृत व बि. बि. एन. असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत पेठ थेट बाजारपेठ या एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही फक्त बाजारपेठ नसून लक्षित गटातील तरुण व नवउद्योजकांना घरगुती व्यवसाय वाढीसाठी ही एकसुवर्ण संधी आहे. तसेच व्यवसायिकांना अमृत पेठ या ऑनलाइन पोर्टलवर व्यवसायाची नोंदणी करता येणार आहे.
या प्रदर्शनात ग्राहकांसाठी विविध दर्जेदार वस्तूंचे दालन विक्रीसाठी खुले असणार आहे. त्याचप्रमाणे विविध सेवा पुरवठादार यांची माहिती देणारे स्टॉल सुद्धा असणार आहेत. अमृत पेठ मध्ये प्रामुख्याने महिला व्यवसायिकांना प्राधान्याने स्टॉल देण्यात आले आहेत. या प्रदर्शनात एकाच छताखाली मराठी नववर्ष गुडीपाडव्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तु, खाद्य पदार्थ, वाळवणाचे पदार्थ, गृहोपयोगी वस्तु, लाकडी घाणा तेल, इमिटेशन ज्वेलरी, बॅग्स व पर्स, पूजा साहित्य, कपडे, इलेक्ट्रिकल साहित्य, टुर्स व ट्रॅव्हल्स, विविध सेवा उद्योग असे अनेक स्टॉल असणार आहेत. तसेच सामाजिक बांधिलकीचा विचार करून निरामय विकास संस्था यांच्या गतीमंद मुलानी तयार केलेल्या वस्तूंचा स्टॉल हा या प्रदर्शनाचे एक आकर्षण असणार आहे. ऋतुरंग हॉल, विश्रामबाग, सांगली येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन असणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देवून, भरपूर खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत व बि. बि. एन. असोसिएशन, सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), सांगली जिल्हा कार्यालय,
राजवाडा, सांगली, 9112228766/ 7972830757, बि बि एन असोसिएशन सांगली, 9699017713 येथे संपर्क साधावा.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत संस्था असून खुल्या प्रवर्गातील जातींसाठी काम करते ज्यात ब्राह्मण समाजाचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील अशा जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही, अशा जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे.
कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक, शेतकरी, पुरोहित अशा सर्वांसाठी अमृत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. या योजनांची माहिती आपल्या ब्राह्मण समाजाच्या प्रत्येकाला व्हावी यासाठी अमृत मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागिरदार व समन्वयक अभिजित कुलकर्णी उपस्थित राहून योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नागरिकांना त्यांच्या मनातील प्रश्न व शंका आपल्याला विचारता येणार असून थेट संवाद साधता येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.



