दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव : विलासराव देशमुख सेंटर, धाराशिव यांच्या वतीने ‘वक्ता धाराशिवचा आवाज तरुणाईचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळविले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक याच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पटकावले.
धाराशिव शहरातील बील गेट्स महाविद्यालयात धाराशिव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या विजेत्या स्पर्धकांची जिल्हास्तरीय अंतिम फेरी १३ ऑगस्ट रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धेत ‘राजकारणातील लोकशाही मूल्ये : आजच्या काळाची गरज’, ‘डिजिटल युगातील माध्यम साक्षरता’ आणि ‘युवक आणि नेतृत्व : आजची प्राथमिकता, उद्याचे भविष्य’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी विचार मांडले. लोकशाही मूल्यांचे संवर्धन, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, माहितीची सत्यता पडताळण्याची आवश्यकता आणि देशाच्या भवितव्यात युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी परखड मते व्यक्त केली.
स्पर्धेत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सिद्धी राजकुमार कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला २ हजार ५०० रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले. प्रगती महेश खलाटे हिने द्वितीय क्रमांक मिळवून १ हजार ५०० रुपये व स्मृतिचिन्ह, तर संजीवनी माने हिने तृतीय क्रमांक मिळवून १ हजार रुपये व स्मृतिचिन्ह पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रमेश दापके यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, विलासराव देशमुख सेंटरचे प्रमुख प्रशांत पाटील, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, राज ढवळे, दौलत निपाणीकर, प्रा. सोमनाथ लांडगे, शशिकांत वैराळे, प्राचार्य रजवी सर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. ज्ञानोबा जमाले व प्रा. समाधान देशमुख यांनी काम पाहिले. प्रास्ताविक सेंटरचे प्रा. रवी निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन अग्निवेश शिंदे यांनी केले, तर आभार रविंद्र केसकर यांनी मानले.
