महाराष्ट्रसामाजिक

सामाजिक न्याय विभागाकडून विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज मागणी

दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याअंतर्गत सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षातील सात पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावा, असे समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

या पुरस्कारांमध्ये (१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, (२) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, (३) पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, (४) संत रविदास पुरस्कार, (५) लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, (६) शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक आणि (७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि समाजोन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या पुरुषांचे किमान वय ५० वर्षे व महिलांचे किमान वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे.

तसेच सर्व पुरस्कारांसाठी शिफारस पद्धती पुढीलप्रमाणे राहील – (अ) व्यक्तीचे संपूर्ण जीवनचरित्र, (ब) व्यक्ती/संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, (क) गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, (ड) सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नसल्याचे प्रमाणपत्र, (इ) संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशील.

सांगली जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सांगली यांच्याकडे सादर करावेत. अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे दिनांक १५ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयात उपलब्ध असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!