दर्पण न्यूज मिरज सांगली -: नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणांवर जलदगतीने तोडगा काढण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा–१) अंतर्गत जत तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना महसूल विभागातील 15 महत्वाच्या सेवा एकाच ठिकाणी आणि एकाच दिवशी उपलब्ध होणार असून मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना त्वरित व सुलभ सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली.
या अभियानांतर्गत जत तालुक्यातील शिबिरांची तयारी अंतिम टप्प्यात असून महसूल यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
या उपक्रमांतर्गत मार्च महिन्यामध्ये ७ मार्च (शनिवार) व १४ मार्च (शनिवार) रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यामध्ये १० एप्रिल (शुक्रवार) व १७ एप्रिल (शुक्रवार), मे महिन्यामध्ये (नगरपरिषद/नगरपंचायत स्तर) 8 मे (शुक्रवार) व 15 मे प्रलंबित फेरफार निपटारा, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीसह वाटप उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी प्रस्ताव, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, तुकडेबंदी कायदा प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करणे, पाणंद रस्ते मुरूमीकरण करणे, नवीन रेशन कार्ड काढणे व कार्डावरील नाव कमी व वाढविणे, उत्पन्न प्रमाणपत्र, नामांतरण (NA) प्रस्ताव, विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, तक्रार निवारण, तसेच प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात येणार आहे.
संबंधित कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा. विशेष करून डफळापूर मंडळामध्ये 7 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-1) चे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे.
या अभिनव उपक्रमामुळे महसूली सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होणार असून समाधान शिबीर हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी दिलासादायक ठरणार आहे.