आवळी बुद्रुक येथे उसाच्या शेतात तणनाशकाची फवारणी करताना औषधाचे फवारे तोंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
उसाच्या शेतात तणनाशकाची फवारणी करताना औषधाचे फवारे तोंडात गेल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे घडली. अनिल अरविंद कवडे (वय ३४, रा. पाटील गल्ली, आवळी बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कवडे हे काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या ‘तांबोळा’ नावाच्या शेतात उसाच्या पिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. उसामध्ये ग्रामोझन नावाच्या तणनाशकाची फवारणी करत असताना औषधाचे फवारे त्यांच्या नाका-तोंडात गेल्याने त्यांना अचानक त्रास होऊन ते बेशुद्ध अवस्थेत खाली पडले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे आवळी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद सी.पी.आर. पोलीस चौकीमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



