दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
बसमधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून पसार होणाऱ्या महिलेला राजारामपुरी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने जेरबंद केले. तिच्याकडून तब्बल ५ लाख ६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील दागिने चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
३ ऑगस्ट रोजी राजारामपुरी जनता बाजार चौक परिसरात बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. संशयित महिला पिंकी विशाल सकटे (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) ही चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले.
चौकशीत तिने बसमधून प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार संदीप सावंत व त्यांच्या पथकाने केली.
