

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :-शिरसगाव सोनसळ येथील डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी व्यसनमुक्ती या विषयावर प्रभावी नाटक सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आदाटे सर उपस्थित होते.
. या नाटकात तीन सासवा व चार सुना अशी संकल्पना मांडण्यात आली. प्रमुख पात्रे – तीन सासवा : पारू, शांता, कमला आणि चार सुना : आरुषी घुटुकडे, शौर्या जाधव, श्रेया जाधव आणि डॉली श्रेया भोसले. तसेच डॉक्टर श्रद्धा आणि नर्स तनया पाटील यांनी आपल्या भूमिका उत्कृष्टरीत्या साकारल्या. व्यसनामुळे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, आरोग्याची हानी आणि समाजातील वाढणारी समस्या यांचे प्रभावी चित्रण नाटकातून करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनी आरुषी घुटुकडे हिने व्यसनमुक्ती या विषयावर इंग्रजी भाषेत संदेश देऊन सर्वांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तिच्या प्रभावी संदेशाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी कौतुक केले. तसेच श्रेया भोसले हिने व्यसनमुक्तीची शपथ सांगून सर्वांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करावा, असे सांगितले. प्रथमेश वाळींबे याने व्यसनमुक्ती विषयावर एकपात्री नाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या प्रभावी सादरीकरणाचे सर्वांनी कौतुक केले.
या नाटकाच्या माध्यमातून दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, मिसरी तसेच इतर घातक व्यसनांपासून दूर राहून निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन जगावे हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच उपस्थित नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण झाली.
या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाच्या शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थिनींनी नाटक प्रभावीपणे सादर केले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री अदाटे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
