
दर्पण न्यूज पलूस /भिलवडी :-
शेती तज्ज्ञ, खेळाडू व उद्योजिका कै सौ पद्मजा परशुराम चितळे यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ चितळे उद्योग समूहातर्फे वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून या उप्रक्रमाची सुरुवात झाली आहे. चितळे डेअरी मानद अध्यक्ष नानासाहेब चितळे यांच्या हस्ते भिलवडी येथे वृक्षांचे वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. त्या वेळी श्री निखिल चितळे, श्री अतुल चितळे, श्री रोहन चितळे आणि इतर चितळे कुटुंबियांसह कर्मचारी उपस्थित होते.
अस्सल देशी प्रकारातील आंबा, पेरू, सोनचाफा आदी प्रकारच्या रोपांचे वाटप केले गेले. सुमारे दीड हजारांहून अधिक रोपे वाटण्याचा संकल्प आहे. कै सौ पद्मजा चितळे या शेती तज्ञ्ज होत्या तसेच त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याबरोबर वृक्ष संवर्धनाचे काम केले होते. त्यामुळेच त्यांच्या आठवणी जपण्यासाठी रोपांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला, असे मे बी जी चितळे, चितळे डेअरीचे पार्टनर निखिल चितळे यांनी या वेळी सांगितले.
या उपक्रमातून देशी वृक्षांचे संवर्धन होण्याबरोबरच भिलवडी परिसरात निसर्ग संवर्धनासाठी एक योगदान देण्याचा हा प्रयत्न आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून या रोपांचे संगोपन होणार आहे. पहिल्यापासून चितळे उद्योग समूह पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत असून, अपारंपारिक उर्जेचा वापर करण्यावर भर देत आहे. सुमारे ८० टक्के वीज, ही अपारंपारिक जसे की विंड मील, सोलार प्लँटच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. कर्मचाऱ्यांनाही पर्यावरण संवर्धन करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून इलेक्ट्रीक व्हेईकल वापराला प्रोत्साहन दिले जात असून, कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष आर्थिक पाठबळ चितळे डेअरी देत आहे, असे निखिल चितळे यांनी नमूद केले.
