आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा ; सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने ):-
तालुक्यातील मौजे आंबेवाडी येथील गौतमी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था मधील कथित अनुदान अपहार व गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या सभासदांनी ग्रामस्थांसह एकत्र येत डॉ. कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, संबंधित संस्थेला सन 2003–2004 मध्ये शासनाकडून २५ घरकुलांच्या बांधकामासाठी अनुदान मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्षात एकही घरकुल नियमानुसार उभारण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून शासन निधीचा अपहार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
संस्थेवर प्रशासक नेमण्यात आलेला असतानाही तत्कालीन माजी चेअरमन यांनी कोणताही वैधानिक अधिकार नसताना संस्थेच्या मालमत्तेबाबत निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेसाठी खरेदी केलेली जमीन वैयक्तिक नावावर करून घेणे तसेच प्लॉटचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद आहे.
२५ घरकुलांसाठी आवश्यक असताना केवळ २० गुंठे जमीन खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून ती जमीन अपुरी असल्याचे सभासद व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम कुठे दाखवले, अनुदानाचा वापर कसा झाला, मंजूर नकाशा व ले-आउटची पूर्तता झाली का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरण हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे असून तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गतही दंडनीय गुन्हा ठरू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संस्थेच्या सभासदांच्या स्वाक्षऱ्यांसह सादर करण्यात आलेल्या या निवेदनात स्वतंत्र,o निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शासनाचा अपहार झालेला निधी वसूल करावा तसेच पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर आर.पी.आय. (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, पत्रकार प्रमोद राऊत, सागर कांबळे, दादासाहेब राऊत, संतोष राऊत, आबा राऊत, अविनाश राऊत, दादासाहेब राऊत कांबळे, विठ्ठल कांबळे, मारुती राऊत, ज्ञानेश्वर कांबळे, मेसू राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थ व सभासदांच्या स्वाक्षर्या आहेत.



