महाराष्ट्रसामाजिक

सांगली येथे तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

दर्पण न्यूज मिरज/सांगली, : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने जिल्ह्यातील तृतीयपंथीय उमेदवारांसाठी दिनांक            26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले  आहे. हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली येथे  होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश तृतीयपंथीय उमेदवारांना शासनाच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार व कर्ज योजनांची सविस्तर माहिती देणे, त्यांना उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. उपस्थित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीच्या क्षेत्रानुसार वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार असून, विविध विभागांच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे. या मार्गदर्शन मेळाव्यामुळे तृतीयपंथीय उमेदवारांना स्वावलंबनाच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यास निश्चित प्रेरणा मिळणार आहे.

या मेळाव्यात उद्योजक बनण्यासाठी शासनाच्या योजना या विषयावर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, विविध कर्ज योजना व अर्थसहाय्य या विषयावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या समन्वयक अनुजा पाटील तर रोजगाराच्या विविध संधी व नोंदणी प्रक्रिया या विषयावर सहायक आयुक्त इनुजा शेख मार्गदर्शन करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!