दर्पण न्यूज मिरज /सांगली : आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक शिक्षणाचे प्रवेश आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे आवाहन बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक सप्ताहाचे औचित्य साधून मिरज कॉलेज, मिरज येथे ‘जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्राचार्य श्रीकृष्ण गायकवाड, उपप्राचार्य बी. व्ही. पाटील, समतादूत संग्रामसिंह छत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य श्रीकृष्ण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी जात प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन केले.
समतादूत संग्रामसिंह छत्रे यांनी पडताळणीच्या तांत्रिक प्रक्रियेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे ‘मानवी दिनांक’ (Human Date) चे पुरावे, महसूल पुरावे आणि गाव नमुना 14 चा उतारा यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली. तसेच, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात कागदपत्रे कशी सादर करावीत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र पडताळणी अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ही कार्यशाळा सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष स्नेहल भोसले व उपायुक्त नागनाथ चौगुले व संशोधन अधिकारी मेघराज भाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रक्रियेतील गुंतागुंत समजण्यास मदत झाली.
या कार्यशाळेस प्रा. शिंदे, प्रा. बनसोडे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. बनसोडे यांनी केले. आभार प्राध्यापिका भारती जाधव यांनी मानले.