मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात
मोफत प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. १९ (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सांगलीतील मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात’ शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे निवास आणि भोजनाची मोफत सुविधा पुरविली जाणार आहे. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 जून 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृह प्रशासनातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
हे वसतिगृह कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचालित ‘राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’, मिरा हौसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली या संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू आहे. प्रवेशासाठी एकूण 80 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये माध्यमिक विभाग (इयत्ता 8 वी ते 10 वी) करीता 20 जागा, उच्च माध्यमिक विभाग (इयत्ता 11 वी व 12 वी) करीता 30 जागा व महाविद्यालयीन विभाग (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी) साठी 30 जागा उपलब्ध आहेत. अर्ज वाटप व स्विकृती दिनांक 15 जून 2026 पासून सुरू झाली असून ती 30 जून 2026 पर्यंत राहील. विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीखेरीज) वसतिगृह कार्यालयामध्ये उपलब्ध होतील. प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या संख्येनुसार या संख्येत बदल करण्याचे अधिकार प्रवेश समितीला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यात पूर्ण भरलेला प्रवेश अर्ज (शाळा/महाविद्यालयामध्ये प्रवेशाबाबत प्राचार्यांच्या प्रमाणपत्रासह). तहसीलदार यांच्याकडील सन 2025-26 या आर्थिक वर्षातील रुपये 1,00,000/- पर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला (मूळ प्रत). मागील परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रकाची सत्यप्रत. गाव कामगार पोलीस पाटील यांचा वर्तणुकीचा दाखला (मूळ प्रत). गाव कामगार तलाठी यांचा रहिवासी दाखला (मूळ प्रत). मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो.