दर्पण न्यूज मिरज/सांगली : मिरज तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी सदस्य पदांची प्रभागनिहाय आरक्षण सोडत शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजल्यापासून संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाहीर विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तरी संबंधित १७ गावांतील सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मिरज तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी सदस्य पदांचे आरक्षण निश्चितीची अधिकृत प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २५ मे २०२६ रोजीच्या “ग्रामपंचायत (बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट) सार्वत्रिक निवडणूक आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे आदेश, २०२६” मधील कायदेशीर तरतुदींनुसार मिरज तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांची प्रभागनिहाय आरक्षण सोडत शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजल्यापासून संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाहीर विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे.
आरक्षण सोडत होणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे १) मल्लेवाडी, २) लक्ष्मीवाडी, ३) लिंगनूर, ४) विजयनगर, ५) भोसे, ६) एरंडोली, ७) डोंगरवाडी. ८) शिपूर, ९) चाबुकस्वारवाडी, १०) कवलापूर, ११) आरग, १२) कळंबी, १३) तानंग, १४) मालगांव, १५) शिंदेवाडी, १६) म्हैसाळ (एस), १७) ढवळी.
सदर आरक्षण सोडतीमध्ये विहित कार्यपद्धतीनुसार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठी (सर्व प्रवर्गातील ५०% महिला आरक्षणासह) जागांचे प्रभागनिहाय आरक्षण निश्चित केले जाईल. आयोगाच्या नियमांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने, पारदर्शक डब्यातून प्राथमिक शाळेतील मुलांकडून जाहीर चिठ्ठ्या टाकून, स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडणार आहे. या विशेष ग्रामसभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता भासणार नाही. तरी वरील १७ गावांतील सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.