महाराष्ट्रसामाजिक

नांदेड येथे 24 व 25 जानेवारीला शहीदी समागम   ; जगभरातील सिख बांधव समागमाला उपस्थित राहणार

 

      दर्पण न्यूज सांगली  : धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि विचारस्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे भव्य शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आणि हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक समागम संपन्न होणार आहे.

       या समागमासाठी देश-विदेशातील लाखो शीख बांधव आणि भाविक नांदेडमध्ये दाखल होणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

        नांदेड शहराला शीख धर्मीयांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे शीख धर्मातील पाच तख्तांपैकी एक असून, दहावे शीख गुरु श्री गुरु गोबिंदसिंह महाराज यांनी येथेच आपले अंतीम कार्य केले. त्यामुळे नांदेडला शीख श्रद्धेचे केंद्र मानले जाते. जगभरातील शीख बांधवांसाठी आयुष्यात एकदा तरी नांदेड येथे येऊन हजूर साहिबमध्ये माथा टेकणे हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानले जाते. त्यामुळेच शहीदी समागमासाठी नांदेडची निवड ही ऐतिहासिक आणि भावनिक दृष्ट्या अत्यंत अर्थपूर्ण ठरते.

         “हिंद-दी-चादर ही उपाधी गुरु तेगबहादूर साहिबजींना त्यांच्या महान त्यागामुळे प्राप्त झाली. स्वतःच्या धर्मापुरते मर्यादित न राहता, काश्मिरी पंडितांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी त्यांनी मुघल सत्तेच्या अत्याचाराविरोधात उभे राहत आपले प्राण अर्पण केले. मानवतेसाठी दिलेले हे बलिदान भारतीय इतिहासातील अद्वितीय उदाहरण मानले जाते. या शहीदी समागमाच्या माध्यमातून त्यांचे विचार, त्याग आणि मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

       या दोन दिवसीय समागमात गुरू ग्रंथसाहिबजींचे अखंड पाठ, कीर्तन, कथाकथन, पारंपरिक गतका सादरीकरण, तसेच भव्य लंगर सेवा आयोजित करण्यात आली आहे.

   कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी विनामूल्य अन्न, पाणी, चहा-नाश्ता, निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनासह प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्था या आयोजनासाठी सक्रिय सहभाग घेत आहेत.

       शहीदी समागमाच्या निमित्ताने हिंद-दी-चादर गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाला सामूहिक अभिवादन करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय एकात्मता, समानता आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेड येथे होणारा हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, इतिहास, श्रद्धा आणि राष्ट्रमूल्यांचा महासोहळा ठरणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!