येडशी गटात राजकीय समीकरणे ढवळून निघाली! कसबे तडवळा गणातून सुदर्शन करंजकरांची उमेदवारी मागणी, सर्व पक्षांचे गणित बिघडले


दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी(संतोष खुने):
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांतील नेत्यांकडून लॉबिंगचा सपाटा सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी जिल्हा परिषद गटातील कसबे तडवळा पंचायत समिती गण हे यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेत आले आहे. या गणातून सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी जोरदार मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) यांच्याकडून तडवळा गावातील युवा नेतृत्व सुदर्शन करंजकर यांनी अधिकृतपणे उमेदवारी मागितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुदर्शन करंजकर हे खासदार सुनेत्राताई पवार यांचे नातेवाईक, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पार्थ पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
करंजकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे मात्र सध्या तरी कसबे तडवळा गणातील सर्वच राजकीय पक्षांची गणिते बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे. जर पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिली, तर या मतदारसंघात अत्यंत चुरशीची व रंगतदार लढत पाहायला मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत असताना सुदर्शन करंजकर यांनी गाव व परिसरातील विकासकामांना प्राधान्य देत संघटन मजबूत केले आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी निर्माण केलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे व विकासाभिमुख भूमिका याचा थेट फायदा निवडणुकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, करंजकर यांची उमेदवारी ही जनतेतूनच पक्षश्रेष्ठींकडे मागितली जात असल्याची चर्चा असून त्यामुळे त्यांचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) कसबे तडवळा गणातून सुदर्शन करंजकर यांना उमेदवारी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळेच येडशी गटातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत.
पक्षाचा अंतिम निर्णय काय असेल, हे येणारा काळच ठरवेल.



