राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाङी येथील वादग्रस्त पाणंद रस्ता अंधश्रद्धेच्या विळख्यात : ग्रामस्थांत भीतीचे वातावरण


कोल्हापूर, अनिल पाटील
चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील पाणंद रस्त्याच्या वादाने काही दिवसापासून अंधश्रद्धेचे स्वरूप धारण केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षापासून गावातील काही शेतकऱ्यांचा व ग्रामपंचायत यांच्यात हद्दीवरून पानंद रस्त्याचा वाद सुरु होता. हा वाद राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांच्या पर्यंत गेला होता. तक्रार केल्यानंतर सुरुवातीला तोडगा न निघाल्या मुळे ग्रामपंचाय व संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार राधानगरी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. यावेळेस तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यामुळे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी प्रत्यक्ष पानंद रस्त्याला भेट देऊन पाहणी करून ग्रामपंचायतिचा ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे पानंद रस्त्यासाठी पन्नास पन्नास टक्के शेतजमीन देण्याचा ठराव, संबंधित शेतकरी व ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा तसेच तहसीलदार राधानगरी यांनी दिलेला पूर्वीचा आदेश या सर्व बाबी लक्षात घेता अपिलार्थी यांचे फेर निर्णय अपील नामंजूर करून संबंधित वादग्रस्त पानंद रस्ता तातडीने खुला करण्याचे आदेश देऊन गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावला होता. याच आदेशानुसार दि. 29 डिसेंबर रोजी या रस्त्याचे काम सुरू होणार होते.
मात्र, काही दिवस आधीच याच रस्त्याच्या उत्तरेच्या बाजूला असलेल्या एका शेतकऱ्याच्या बांधावर झुडपांमध्ये लिंबू व काळी बाहुली बांधण्यात आल्याचे काही शेतकऱ्यांना निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रांताधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात अंधश्रद्धेच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
या घटनेमुळे गावात गैरसमज, भीती व तणावाचे वातावरण पसरून गावातील सामाजिक सलोखा गढूळ करण्याचे काम काही अज्ञात विघ्न संतोषी लोकांकडून होत असल्याचे ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.



