रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्याची गुरूकिल्ली : जिल्हाधिकारी अशोक काकडे
दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज

दर्पण न्यूज मिरज/ सांगली – : दिव्यांग मुलांमध्ये प्रचंड क्षमता आणि उपजत कौशल्ये आहेत. त्यांना योग्य संधी आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाल्यास ते समाजासाठी मोठा बदल घडवू शकतात. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा उपक्रम केवळ शिक्षण नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष प्रेरणेने आणि वर्शीप फाउंडेशन पुणेचे संचालक दिनेश कदम यांच्या सहकार्याने कै. रा. वि. भिडे मूकबधीर शाळा, मिरज येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि रोबोटिक्स प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, निरंजन आवटी, वर्शीप फाउंडेशन पुणेचे संचालक दिनेश कदम व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर समाजानेही विशेष आणि एकत्रित प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन या मुलांमधील कौशल्ये विकसित करण्यासाठी काम करावे. दिव्यांग मुलांची ताकद काय आहे, शक्तिस्थळ काय आहेत हे आता आमच्या लक्षात आले असून त्यांच्या शक्तिस्थळांचाच विकास करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून, त्यांना महिन्याला किमान 40 ते 50 हजार एवढे उत्पन्न आयुष्यभर मिळेल या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे.
दिव्यांग मुलांमध्ये फार मोठी क्षमता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, Applus Idiada आणि Worship Earth Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्यात 40 कर्णबधीर विद्यार्थ्यांना वायरलेस ड्रोन तयार करणे, ते उडवणे आणि विविध क्षेत्रांत त्याचा उपयोग कसा करता येतो, याचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगून त्यांनी मिरज येथील कै. रा. वि. भिडे मूकबधीर शाळेने यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक करून मुलांचे भविष्य उत्तम राहो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
दिनेश कदम यांनी या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू स्पष्ट केला आणि शाळेचे कार्य पाहून देश पातळीवर या शाळेचा नावलौकिक होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुरेश आवटी यांनी केले. आभार निरंजन आवटी यांनी मानले. जिल्हाधिकारी महोदयांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम सांगली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा आणि परिवर्तनकारी टप्पा ठरला असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.



