जीवन सुकर करण्यासाठी परिपूर्ण कौशल्य आत्मसात करणे आवश्यक ; जिल्हाधिकारी अशोक काकडे
बालगृह, निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षणाचे उद्घाटन

दर्पण न्यूज मिरज / सांगली : अनेक कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा कोणतेही एक चांगले व परिपूर्ण कौशल्य जर आत्मसात केले, तर आपण आपले जीवन सुकर करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हा महिला बाल विकास विभाग सांगली अंतर्गत कै. दादू काका भिडे मुलांचे बालगृह व शंकरलाल मालु मुलींचे निरीक्षण गृह / बालगृह सांगली येथे रोबोटिक प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, विनायक सिंहासने, वर्शीप फाउंडेशनचे दिनेश कदम आदी उपस्थित होते.
बालगृहातील मुलांसाठी रोबोटिक सेन्सर व ए. आय. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) शिक्षण कार्यशाळा आजपासून सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण Applus Idiada आणि Worship Earth foundation यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पंधरा दिवसाचा असून टप्प्याटप्याने पुढील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सांगली पॅटर्न अंतर्गत बालगृहातील मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विशेषतः रोबोटिक्स आणि ए. आय. हे सर्व मुलांना उपलब्ध व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बालगृहातील मुलांना रोबोटिक प्रशिक्षण देण्याचा हा ‘सांगली पॅटर्न’ इतर जिल्ह्यांकरिता आदर्श निर्माण करण्याचा मानस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध रोबोटिक व सेन्सर किट्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. यात लाइट सेन्सर, तापमान सेन्सर, टच सेन्सर, वॉटर सेन्सर, मेटल सेन्सर, व्हायब्रेशन सेन्सर, लेझर आणि IR सेन्सर अशा दैनंदिन जीवनाशी निगडित तंत्रज्ञानांची ओळख समाविष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्टर बोर्ड वापरून हे सेन्सर जोडण्याचा आणि त्यांचे परिणाम जाणून घेण्याचा प्रत्यक्ष सराव करण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणामुळे विशेष विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होण्यास मदत होईल तसेच त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य वाढेल.
या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बालगृह व निरीक्षणगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.



