शेतीमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांनाही प्रोत्साहन द्यावे ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील
उत्पादक खरेदीदार संमेलनात प्रतिपादन : संमेलनास शेतकरी, निर्यातदारांचा उत्स्फूर्त सहभाग ; 48 शेतकरी गटांचे स्टॉल, 45 निर्यातदार / खरेदीदारांचा सहभाग


दर्पण न्यूज मिरज/सांगली -: परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका. शेतीपूरक व्यवसाय सुरू केल्याशिवाय शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार नाही. शेतमालावर प्रकिया ही काळाची गरज असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
सांगली पॅटर्न – चला शेतकऱ्याला व्यापारी करू… या घोषवाक्यासह आयोजित उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दीपायन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास कृषि आयुक्त सूरज मांढरे व अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उत्पादक खरेदीदार संमेलनातून शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे. शेतीमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांनाही प्रोत्साहन द्यावे. अशा संधी उपलब्ध होण्यासाठी अपेडाने पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. यावेळी त्यांनी स्वानुभवाचे विविध दाखले देत शेतीमधील स्वप्रयोगांची माहिती दिली. तसेच, संमेलनाच्या आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे व कृषि विभागाचे अभिनंदन केले.
उत्पादक खरेदीदार कृषि संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करुन दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना कृषि आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीमालाचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. यासाठी उत्पादक व खरेदीदारांनी परस्पर सुसंवाद ठेवावा. जगाच्या बाजारपेठेची स्थिती व गरज शेतकरी बांधवांनी जाणून घेण्याची गरज आहे. त्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने शेती करावी. जी. आय. मानांकित उत्पादने घ्यावीत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत. त्यासाठी हे संमेलन दिशादर्शक ठरेल. यातून चांगले करार होऊन संमेलनाचे सार्थक होईल, असा विश्वास व्यक्त करून यावेळी त्यांनी यासाठी राज्यस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कृष्णाकाठच्या व येरळा, वारणा आदि उपनद्यांच्या परिसरात वसलेल्या सांगली जिल्ह्यातील नररत्नांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती दिली आहे. जिल्ह्याला राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, कृषि क्षेत्रात मोठा वारसा आहे. या सर्वांनी सांगली जिल्ह्याला आकार दिला आहे. शेती सांगलीची शान असून, इथल्या द्राक्ष, डाळिंब, केळी, ड्रॅगनफ्रुट आदिंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याचा लाभ होऊन इथल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, या हेतूने हे संमेलन आयोजित केले आहे. या उत्पादक खरेदीदार कृषि संमेलनातून केवळ एकच दिवस नव्हे तर दोघांतही नियमित सकारात्मक संवाद व्हावा. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या उपक्रमाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यात या संमेलनाचे योगदान राहील, असे सांगून त्यांनी आपण पाहिलेले हे सर्वोत्तम संमेलन असल्याचे सांगितले. यावेळी अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, मित्राचे केदार पवार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, पशुसंवर्धन उपयुक्त अजयनाथ थोरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विवेक कुंभार यांनी केले. आभार राजेश शहा यांनी मानले. सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले. रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. तसेच, कृषि विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, अपेडा व कृषि विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
14.39 कोटीचे खरेदी विक्रीबाबत करार
जतचे उपविभागीय अधिकारी गणेश श्रीखंडे म्हणाले, यावेळी 145 शेतकऱ्यांची 14.39 कोटी रूपयांची 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार पार पडले. त्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 48 शेतकरी गटांनी या संमेलनात स्टॉल लावले होते. 45 निर्यातदार / खरेदीदारांनी संमेलनात व 145 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवला. जवळपास दीड हजारच्या आसपास शेतकरी उपस्थित होते. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संमेलनात विविध संलग्न विभागाचे अधिकारी, जिल्ह्यासह राज्यभरातील निर्यातदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.


