औदुंबर येथे सद्गुरु दत्त महाराजांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साकडे
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी संघटनेच्या मागणीप्रमाणे ऊसाला दर देण्याची मागणी


दर्पण न्यूज पलूस/भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील औदुंबर येथे सद्गुरु दत्त महाराजांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साकडे घालण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी संघटनेच्या मागणीप्रमाणे ऊसाला दर दिला, मग सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ते का जमू नये, असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
संघटनेने मागणी केली की, 12 नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरप्रमाणे ऊसाचा एफआरपी 3400पेक्षा ज्यास्त आहे त्या कारखान्याने एफ आर पी अधिक 100 रुपये जाहीर करावा तसेच ज्या कारखान्यांचा दर 3400 रुपयांच्या आत आहे त्यांनी 3500 रुपये द्यावेत. अन्यथा 13 नोव्हेंबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे.
या आंदोलनाची सुरुवात क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड व स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन करण्यात येणार आहे.
कारखानदारांना सुबुद्धी यावी यासाठी औदुंबर येथे सद्गुरु दत्त महाराजांना ऊस अर्पण करून साकडे घालण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की, सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी “एफआरपीपेक्षा एक रुपयाही अधिक देता येणार नाही” असे सांगितले होते. परंतु, संघटनेने व्यवहार्य भूमिका घेतल्याने दोन्ही बाजूंनी समंजस पाऊले उचलली आणि कारखानदारांनी अखेर 3400 रुपयाच्या आतील कारखान्यांनी आणि 3500 काही कारखान्यांनी यापेक्षाही जास्तीचा दर जाहीर केला तसेच 3400 च्या वरील कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर 100 रुपये अधिक दर जाहीर केला. त्यामुळे ऊसाला ज्यादा दर देता येऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखानदारांना आवाहन करण्यात आले आहे की, स्वाभिमानी संघटनेला जर श्रेय मिळते असं वाटत असेल तर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन स्वतःहून दर जाहीर करा. अन्यथा 12 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना ऊस तोड बंद ठेवण्याचे व वाहतूकदारांनी दिनांक 12 नंतर ऊस वाहतूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व साखर कारखानदारांनी तात्काळ उसाचा दर जाहीर करावा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे,प्रकाश देसाई पलूस तालुका युवा आघाडी अध्यक्ष धन्यकुमार पाटील, राहुल जोशी, संदीप पाटील, मनोहर पाटील, विजय पाटील, सुधीर खोत, रोहित पाटील, टि के सरगर तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


