कृषी व व्यापारमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अतिवृष्टी : जिल्ह्याला आत्तापर्यंत ₹ १,०९८ कोटींचे अभुतपुर्व अनुदान आणखी मदत मिळणार, पाठपुरावा सुरु : आमदार राणाजगजितसिंह पाटील

शेतकरी बांधवांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे जिल्हावासीयांच्या वतीने मानले आभार

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी ( संतोष खुणे):-
रब्बी पेरणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त मदतीचा शासन आदेश मंगळवारी निर्गमित झाला आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल ₹ ५७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी ₹ १८९ कोटी, सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे ₹ २९२ कोटी आणि खरवडून गेलेल्या जमिनीचे ₹ ४० कोटी असे एकूण ₹ ५२१ कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने मंजूर केले आहेत. काल जाहीर मंजूर झालेले ₹ ५७७ कोटी आणि पूर्वीचे ₹ ५२१ कोटी असे एकूण ₹ १,०९८ कोटी रुपयांचे अभुतपुर्व अनुदान जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. या अभुतपूर्व मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेले नुकसान अभूतपूर्व आहे त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी. अशी आग्रही मागणी आपण अगदी पहिल्या दिवसापासून लावून धरली होती. त्याचा सलग पाठपुरावाही केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जवळपास सर्वच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे निर्णय घेतला. सुरूवातीला ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना दिलासा ₹ १८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची व्याप्ती मोठी होती. त्यापोटी तब्बल ₹ २९२ कोटी ४९ लाख रुपये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. ज्या ठिकाणी जमीन खरवडून गेली, विहिरींचे नुकसान झाले त्या ठिकाणीही भरीव मदत करणे आवश्यक असल्याचे ध्यानात घेत ₹ ४० कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आले. रब्बी हंगामात पेरणीसाठी बी-बियाणे, खत यासाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ₹ १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली होती. त्याचा शासन आदेश मंगळवारी निर्गमित झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी तब्बल ₹ ५७७ कोटी रुपयांची भरीव मदत आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजूर केली आहेत. नुकसानीची व्याप्ती मोठी आहे.त्यामुळे जास्त नुकसान झालेले शेतकरी व खरडून गेलेल्या जमिनीसाठी अधिकची मदत मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहेत. आजवर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल ₹ १०९८ कोटी रुपयांचे अभुतपुर्व अनुदान मंजूर झाले आहे. याव्यतिरिक्त बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अनुदान मिळावे याकरिता आपण आग्रही प्रयत्न करीत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात जून महिन्यापासूनच पावसाने गोंधळ घातला. जून महिन्यात २६६ शेतकर्‍यांचे नुकसान झाले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे तब्बल दोन लाख ३४ हजार ९५५ शेतकर्‍यांच्या वाट्याला नुकसान आले. जुलै-ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात पावसाने सर्वाधिक गोंधळ घातला. त्यामुळे चार लाख चार हजार ६५६ शेतकर्‍यांच्या शेती आणि पिकांचे नुकसान झाले. जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण नुकसानीपोटी आत्तापर्यंत एकूण सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी तब्बल ₹ १,०९८ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पावणेतीनशे कोटींची मदत वितरीतही करण्यात आली आहे. उर्वरित शेतकर्‍यांना मदत वितरीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठीही हजार कोटी

जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी ₹ ३,२९५ कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यत बहाल करण्यात आली आहे. राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सादेखील देण्यास आपल्या महायुती सरकारने मंजुरी दिली आहे. ठाकरे सरकारने त्याच वेळी राज्याच्या वाट्याचा पन्नास हिस्सा दिला असता तर कदाचित आत्तापर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्णही झाला असता. ठाकरे सरकारने राज्यहिस्सा निधी न दिल्यामुळेच प्रकल्प किंमत ₹ ९०४.९२ कोटी वरून ₹ ३,२९५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिल्याबद्दल तसेच आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर यावे याकरिता राज्याच्या तिजोरीतून हजार कोटीहून अधिक रुपयांचा वाटा उचलल्याबद्दल सबंध धाराशिवरांच्या वतीने कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!