निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही : उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे
विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर

दर्पण न्यूज भिलवडी/ सांगली :- : सांगली जिल्ह्यातील 61 निवडणूक विभाग करिता पुढील कालावधीसाठी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीसंदर्भातील आक्षेप नामंजूर झाल्यामुळे प्रारूप निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षणामध्ये बदल झालेला नाही. निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम करण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशामधील तरतुदीनुसार सांगली जिल्ह्यातील 61 निवडणूक विभाग करिता पुढील कालावधीसाठी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गसाठी राखून ठेवायची आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करण्यात आली. तसेच जिल्ह्यात 10 तालुक्याच्या ठिकाणी एकूण 122 निर्वाचक गणाकरिता दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निर्वाचक गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यावर दि. 14 ते 17 ऑक्टोबर 2025 अखेर हरकती व सूचना सादर करण्याच्या कालावधीत प्राप्त झालेले सर्व 73 आक्षेप विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे यांनी नामंजूर केले. त्यामुळे प्रारूप निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षणामध्ये बदल झालेला नाही. निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे


