सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरणार : आरपीआयचे विशाल तिरमारे

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस /सांगली :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांच्या साठी आज सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना भेटून कामगारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने कुपवाड येथे सुरू असणारे भांडी पेटी वाटप चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे.दिवसाला जवळपास दोन हजार लोकांना भांडी देण्यासाठी बोलावले जाते.सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारो कामगार त्याठिकाणी भांडी नेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांग लाऊन उभा असतो परंतु त्याला टोकन देऊन भांडी न देता पाठीमागे पाठविले जाते.यामुळे मोठ्या प्रमाणात कामगाराची आर्थिक, शारीरिक, मानसिक पिळवणूक होत आहे.कारण नसताना कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू आहे. पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने नको ते उद्योग कामगार मंडळाने करून ठेवले आहेत.कामगार मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याकडे मंडळाने लक्ष देऊन कामगाराचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी विशाल तिरमारे यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा पलूस कडेगांव खानापूर या पाच तालुक्यातील बांधकाम कामगारांना कुपवाड याठिकाणी भांडी पेटी आणण्यासाठी जावे लागत आहे. कुपवाड हे ठिकाण ये जा करण्यासाठी लांब अंतर पडत आहे. कामगाराचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तरी या पाच तालुक्यात मध्यवर्ती ठिकाण म्हणून पलूस मध्ये भांडी पेटी वाटप करण्यासाठी गोडाऊन निर्माण करावे. या विभागातील कामगारांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्यासह शिष्टमंडळाने दिले.यावेळी आरपीआयचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संजय मस्के, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष शीतल मोरे, युवा नेते स्नेहलकुमार कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.कुपवाड येथील भांडी वाटप केंद्रास भेट देऊन कामगाराच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या.


