कुणाला न जुमानता आमदार डॉ.विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्याकडून वसगडे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित


दर्पण न्यूज पलूस-भिलवडी (मुख्य संपादक अभिजीत रांजणे) :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे रेल्वे उड्डाणपूल सोमवारी अखेर कुणाला न जुमानता आमदार डॉ विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील वाहतुकीसाठी खुले केले.लोकांना होणारा त्रास मी कदापि सहन करून घेणार नाही. पूल बांधून पूर्ण झाले लोकांनी खड्ड्यातून जायचे का? असा सज्जड इशारा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी यावेळी दिला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
पलूस तालुक्यातील वसगडे येथे महाराष्ट्र रेल कॉर्पोरशनने बांधलेल्या ‘अत्याधुनिक’ उड्डाणपूलाचे दिवाळीत उदघाटन होणार होते. मात्र दिवाळी होऊनही दोन-तीन दिवस उलटले तरी याचे लोकार्पण रखडले होते.
प्रचंड वर्दळीचा असणारा हा राज्यमार्ग आहे. सांगली-पलूस या मार्गावर ट्रक, टेम्पो, दूधाचे टँकर, पेट्रोल टँकर आदींसह अवजड वाहने यांची मोठ्या प्रमाणात येथून ये -जा असते. दिवसातून अनेकदा रेल्वे जाण्यासाठी गेट बंद असते. यासाठी येथे उड्डाणपुलाची निर्मिती केली. परंतु त्याचे लोकार्पण झाले नव्हते. याचा नाहक त्रास वाहनधारक, प्रवासी, नोकरदार यांना नेहमीच बसत होता. आता त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. आमदार व खासदार यांच्यासह सर्व नेत्यांचे वाहनधारकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले. या पूलामुळे व्यापार-उद्योग क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. वाहतुकीची कोंडी आणि रेल्वे क्रॉसिंगवरील विलंब या समस्येपासून आता कायमचा दिलासा मिळेल.
लोकार्पण केल्यानंतर आ.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले,
हा उड्डाणपूल तयार होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पण उद्घाटनाच्या विलंबामुळे अद्याप पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही ही खेदाची बाब होती. दसऱ्याच्या दिवशी पुलाचे उद्घाटन होणार होते ते सुद्धा रखडले.
स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री महोदयांना वेळ नसल्याचे कारण सांगून उदघाटनाची सुरु असलेली टाळाटाळ कुठेतरी थांबवायला पाहिजे होती. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे हे नक्की.
यावेळी महेश खराडे, अमोल पाटील, अनिल पाटील, रावसाहेब पाटील, प्रल्हाद गडदे, शिवाजी पाटील, चंद्रशेखर मद्वाण्णा, सर्जेराव यादव यांच्यासह खटाव, ब्रम्हनाळ, वसगडे, भिलवडी स्टेशन येथील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


