बुध्दविहारे ही समाजातील संस्कार केंद्रे असतात : विजय गायकवाड

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी
(संतोष खुणे) :-
बुध्द काळापासून भारतातील बुध्दविहार हे मानवावरती संस्कार करणारे संस्कार केंद्र आहे. प्रबोधनाचे कार्य करणारे प्रबोधन केंद्रे आहेत. ढोकी येथील साखर कारखाना परिसरात श्रावस्ती बुध्दविहार हे बुध्दांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करत आहे. तेर-ढोकी व आसपासच्या परिसरात मौर्य काळापासून बुध्द संस्कृती बहरली होती. याची साक्ष देत अनेक सांस्कृतिक पाऊलखुणा बुध्दसंस्कृतीची साक्ष देत उभ्या आहेत. बुध्दाच्या शिकवणूकीत त्रिशरण, पंचशील, आष्टांगीक मार्ग, दहा पारमिता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा यामुळे संस्कारशिल समाज निर्माण होतो. असा संस्कारशिल समाज निर्माण करण्याचे कार्य ढोकी कारखाना परिसरातील श्रावस्ती बुध्दविहार करत आहे असे विचार बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त विजय गायकवाड यांनी व्यक्त केले.या प्रसंगी उपासक अशोक बनसोडे, बाळासाहेब माने, प्रभाकर बनसोडे, बलभीम कांबळे यांनी बुध्द विहारात भगवानबुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. उपासक आप्पा कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रावस्ती बुध्दविहार हे या परिसरातील जिल्हयातील प्रत्येक गावातील समाज बांधवांनी पाहून लहानशा जागेत सुध्दा सुंदर बुध्दविहार निर्माण करता येते याचे उदाहरण आप्पा कांबळे व त्यांच्या सहकार्यांनी दाखवून दिले आहे. बुध्दविहारास अनेक दानशूरांनी वेळोवेळी मदत केली आहे असे आप्पा कांबळे यांनी सांगितले. पुढील काळात सुध्दा विहाराच्या वाढीसाठी मदतीचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी संविधान अभ्यासक बलभीम कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेची प्रत आप्पा कांबळे यांना दिली. वैभव कांबळे यांनी सर्वांचे आभार मांडले.


