जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी ; जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज मिरज/ सांगली : जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीस पुतळा समिती सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक भैराप्पा तळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. पी. मिरजकर, जत नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदि उपस्थित होते.
अध्यक्ष, महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनेनुसार पडताळणी केली गेली. त्यामध्ये मुख्याधिकारी नगरपरिषद जत यांचा ठराव व अहवाल, पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अहवालान्वये सर्व संबंधित यंत्रणांनी मौजे जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याबाबत अहवाल सादर केला होता.
या अनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे पालन पुतळा उभारणाऱ्या संस्थेने / कार्यालयाने करण्याचे तसेच पुतळ्याची रचना, आकारमान इत्यादीबाबत बारकाईने निरीक्षण करण्यात येऊन लवकरात लवकर सदरचा अश्वारूढ पुतळा बसविण्याबाबतची कार्यवाही अध्यक्ष, महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी करणे या अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास मंजुरी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.


