महाराष्ट्रराजकीयसामाजिक

गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

         दर्पण न्यूज  मुंबई : शीख पंथाचे ९ वे गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य हे केवळ शीख पंथीयांसाठी नव्हे, तर संपूर्ण भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गुरु तेग बहादुर यांच्या  हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर पोहोचविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त दादर येथील योगी सभागृहात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

            कार्यक्रमास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार बाबू सिंह महाराज, अल्पसंख्यांक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, संत ज्ञानी हरनाम सिंघजी (खालसा भिंदरनवाले मुखी दमदमी टकसाल, प्रधान सत समाज), राज्यस्तरीय समितीचे रामेश्वर नाईक, सरताज सतींदर, महंत सुनील महाराज, स्वामी हिरानंद, प्रसिद्ध गायक सतेंदर सरताज आदींसह  विविध सहा समाजाचे संत, गुरू आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरु तेग बहादुर यांनी भारतातील सर्व धर्मीयांच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे. म्हणूनच त्यांना ‘खालसा दी चादर’ नव्हे तर ‘हिंद दी चादर’ म्हटले गेले. त्यांनी धर्मांतरास विरोध करत भारताच्या संस्कृती आणि श्रद्धेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नांदेड, नागपूरसह मुंबईत शहिदी समागमनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात गुरू तेग बहादुरांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

            मुख्यमंत्री म्हणाले की, गुरूबाणी ही जगातील एक अशी अनोखी रचना आहे ज्यात केवळ शीख गुरूंचेच नव्हे तर संत नामदेवांचे आणि विविध पंथांचे चांगले विचार समाविष्ट आहेत. सर्व चांगल्या विचारांना सोबत घेऊन जीवनाचा मार्ग दाखवणारी ही गुरूबाणी आपल्याला जोडण्याचे काम करते. या कार्यक्रमानिमित्त शीख, सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी हे सहा समाज एकत्र आले आहेत. हा कार्यक्रम जनमाणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती आणि शासन एकत्रितरित्या काम करेल.

            यावेळी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब’ यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!