देश विदेशराजकीयसामाजिक

कूळ, मुंडकारांसाठी कार्य करून रवी नाईक यांनी वारसा निर्माण केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना मान्यवरांची श्रद्धांजली

दर्पण न्यूज पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना, ‘जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले…’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत रवी नाईक यांनी तळागाळातील आणि आवाज नसलेल्या सामान्य माणसांसाठी कार्य करून कूळ आणि मुंडकारांसाठी वारसा निर्माण केला, असे गौरवपूर्ण उद्गार काढले.

माजी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री रवी नाईक यांचे मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी गोवा सरकारतर्फे आज कला अकादमीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन महत्त्वाच्या बाजू अधोरेखित केल्या. ते म्हणाले, “गृहमंत्री म्हणून घेतलेली कणखर भूमिका आणि कृषीमंत्री म्हणून जपलेली संवेदनशीलता या रवी नाईक यांच्या दोन बाजू जनतेच्या नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी तयार केलेला वारसा चिरकाल टिकेल. रवी नाईक हे उत्तम व्हॉलीबॉलपटू होते आणि ती खिलाडूवृत्ती त्यांनी राजकारणातही कायम ठेवली होती. ते आयुष्यात अनेकदा जिंकले आणि हरलेही, पण त्यांनी आपली ही खिलाडूवृत्ती कधी सोडली नाही. त्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला, पण व्यक्तिगत कोणाचा द्वेष केला नाही. ते समाजातील दबलेल्या, पिचलेल्या आणि वंचित घटकांचा आवाज बनले.

बहुजन समाजाचे कैवारी आणि उत्तम प्रशासक

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांना बहुजन समाजाचे कैवारी संबोधले. ते म्हणाले की, “सर्व समाजाला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न सदैव स्मरणात राहणार आहे. कुळ-मुंडकार असो किंवा कृषी क्षेत्र, त्यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील तरुणांसाठी ते एक प्रेरणास्थान होते. त्यांनी अनेक खात्यांचा कारभार करत असताना सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. विविध क्षेत्रात केलेला विकास हा कायम सर्वांच्या लक्षात राहणार आहे.

तपोभूमी रवींमुळेच साकारली अशा शब्दात कुंडई येथील तपोभूमीचे श्री ब्रह्मेशानंद महाराज यांनी रवी नाईक यांच्या योगदानाची आठवण करून दिली.उद्योजक अवधूत तिंबलो यांनी रवी नाईक यांच्यातील व्यक्ती आणि नेतृत्वाच्या खास गुणांचे यावेळी स्मरण केले.भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर यांसारख्या नेत्यांच्या पंक्तीत रवी नाईक यांचे नाव असल्याचे सांगून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी भावना व्यक्त केल्या.भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर रवी नाईक हेच खऱ्या अर्थान बहुजन समाजाचे नेते असल्याचे सांगून अॅड. रमाकांत खलप यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानवडे, सभापती गणेश गावकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दामू नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!