महाराष्ट्रसामाजिक

शिवभवानी शिल्प ; आणखी बारकावे तपासले जाणार आमदार पाटील यांची राज्याच्या कला संचालनालयाला भेट

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) -:
तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात १०८ फूट उंच शिवभवानी शिल्पामुळे आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे शिल्प आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अंगाने परिपूर्ण असावे यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून प्रतिकृतींचे आणखी बारकावे तपासले जाणार आहेत. राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर करण्यात आलेल्या एकूण १४ प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे.धार्मिक आणि प्राचीन इतिहास क्षेत्रातील तज्ञांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांप्रमाणे पुन्हा नव्याने निवड करण्यात आलेल्या शिल्पकारांना दुरुस्तीसह प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे. आपण स्वतः शनिवारी कला संचालनालयाल भेट दिली. प्रचंड ऊर्जेचे स्रोत असलेल्या छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शिल्प प्रतिकृतीचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे साकारण्यात येणाऱ्या १०८ फूट उंच शिवभवानी शिल्पासाठी पाच प्रतिकृतींची निवड राज्याच्या कला संचालनालयामार्फत करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या एकूण १४ प्रतिकृतींपैकी निवडण्यात आलेल्या या पाच शिल्प प्रतिकृतींची पाहणी पुन्हा एकदा तज्ज्ञांच्या समितीकडून केली जाणार आहे. त्यातील अध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक बारकावे तपासल्यानंतरच कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प अंतिम केले जाणार आहे. शिल्पकला ,प्राचीन इतिहास संशोधन,धार्मिक आदी क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या या समितीत सहभाग असणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रतिकृतींची अत्यंत बारकाईने पाहणी केल्यानंतर तज्ञांच्या या समितीकडून आवश्यकतेनुसार काही सूचना आणि फेरबदल सुचविले जातील. आणि त्यानंतर या पाचही शिल्पकारांना सुचविण्यात आलेले फेरबदल आणि सूचना यानुसार पुन्हा एकदा शिवभवानी शिल्पाची प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या पाचपैकी एक प्रतिकृती अंतिम केली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

अष्टभुजा ‘शिवभवानी’चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार सर्व भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून या शिल्पाची उभारणी केली जात आहे. तुळजाभवानी मातेचे १०८ फुट उंचीचे ब्राँझ धातूचे शिल्प साकारण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाचे हे शिल्प असणार आहे. हे शिल्प कसे असावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा १४ शिल्पकारांनी अडीच ते तीन फूट उंचीचे फायबरचे मॉडेल राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर केले होते. ज्या प्रसंगावर हे शिल्प उभारण्यात येणार आहे, त्याचे धार्मिक, एेतिहासिक महत्व मोठे आहे. त्यातील बारकावे अधीक गांभीर्याने समजून घेण्यासाठी एकवेळा मुदतवाढही देण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त झालेल्या १४ शिल्पांतून ५ शिल्पांची निवड करण्यात आली.

संग्रहालयासह माहिती केंद्रही उभारले जाणार

या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा देखील अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे. हे प्रेरणादायी आणि भव्य शिल्प ३ मजली इमारती एवढ्या आकाराच्या बेसमेंटवर उभारले जाणार आहे. या बेसमेंटच्या आत एक संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच २० एकर जागेवर आकर्षक बगीचा साकारण्यात येणार आहे, सोबत आकर्षक प्रकाश योजनाही केली जाणार आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!