सांगली जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात भोंगळ कारभार ; वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली

दर्पण न्यूज मिरज/सांगली : वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली यांच्या शिष्टमंडळाने, जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. मोहन गायकवाड यांना तात्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर कार्यालयाच्या पत्र क्रमांक शिउर्स/प्राथ/2025/164 दि. 19/8/2025 तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिस/मा.अ./कांबळे/आस्था101/1/1395389/2025 दि. 28/8/2025 यामधील माहितीप्रमाणे, श्री. गायकवाड यांच्याविरुद्ध अनेक गंभीर तक्रारी प्राप्त असूनही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
श्री. गायकवाड यांनी सांगली जिल्हा परिषदेतील सेवाकाळात अनेक वेळा वादग्रस्त निर्णय, शिक्षक संघटनांशी संघर्ष, भ्रष्टाचाराच्या तक्रारी व गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये नाव आले असूनही, त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“गंभीर तक्रारी व माहिती अधिकारातून उघड झालेले दस्तऐवज पाहता गायकवाड यांची तत्काळ निलंबन व चौकशी अपरिहार्य आहे. अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन उभारले जाईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा इशारा संजय कांबळे यांनी आणि शिष्टमंडळाने निवेदनातून दिला आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री मा. श्री. दादा भुसे, पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील, तसेच शिक्षण संचालक, आयुक्त (शिक्षण) व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
“शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी व प्रामाणिक कारभार प्रस्थापित करण्यासाठी भ्रष्ट व वादग्रस्त अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी युनियनने केली आहे.
यावेळी, पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, सांमिकु महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, संगाप्पा शिंदे यांच्याबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


