आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना

 

 

 

एखाद्या गरीब कुटुंबातील कर्त्या व्यक्तिचे निधन झाल्यानंतर त्याचा परिवार अडचणीत येतो. अशा कुटुंबांना आधार व संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दोन्ही योजना या एका वर्षाचे विमा संरक्षण असणाऱ्या अपघात व जीवन विमा योजना आहेत. या योजनांचे दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असून बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ इतर विमा कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाते. या योजनांविषयी जाणून घेऊया…

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

18 ते 50 वयोगटातील ( वय वर्ष 50 च्याअगोदर सहभागी झाल्यास वय वर्ष 55 पर्यंत सहभागी होता येत) सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा आहे. विमा हप्ता 436 रूपये प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील. विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसास 2 लाख रूपये भरपाई मिळेल.

 

एकाच व्यक्तिची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याव्दारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तिचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल. ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे. ‍विमा धारकाने 55 वर्षे वय पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल. तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

18 ते 70 वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा आहे. विमा हप्ता 20 रूपये प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील.‍

 

या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रूपये, दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी / दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे / एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास  2 लाख रूपये व एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रूपये दिले जातात.

 

एकाच व्यक्तिची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याव्दारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तिचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल. ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे. विमा धारकाने 70 वर्षे वय पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी  शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल. तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

 

या दोन्ही योजनांसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खासगी बँका, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास / नवीन खाते उघडून या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतो.

 

(संकलन – श्री. शंकरराव पवार, जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!