दर्पण न्यूज सांगली : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून सांगली जिल्ह्यात बुधवार, दि. १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी जनसुनावणी होणार असून, आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दि. १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी सांगली जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणीनंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदि विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदि उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.
00000