महाराष्ट्रराजकीयसामाजिक

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी ; सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे

अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोहीम ; 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस

 

 

       दर्पण न्यूज मिरज /सांगली : अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये बनवून विक्री करावेत. शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. ग्राहकांनीही सतर्क राहून कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी परिमंडळ-1 रा. अ. समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, अन्न व औषध प्रशासन, सांगली यांच्यावतीने सणासुदीच्या पार्श्वभूमिवर दि. 11 ऑगस्ट 2025 पासून सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जात असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये दि. 11 ऑगस्ट 2025 पासून ते आजपर्यंत अन्न विक्री करणाऱ्या एकूण 174 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दूध 38, खवा मावा 14, तूप 28, खाद्यतेल 36, मिठाई 58, ड्रायफ्रुटस 18, चॉकलेट 20, भगर 14 व इतर अन्नपदार्थ (रवा, बेसन, आटा इत्यादी) चे 43 नमुने असे एकूण 269 अन्न नमुने घेतले असून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

तपासणीच्या अनुषंगाने 51 अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून 09 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, 4 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करुन 984 लिटरचा व 3 लाख 83 हजार 581 रुपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून 46 किलो वजनाचा 14 हजार 375 रुपये किंमतीचा बर्फीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून 47.3 किलो वजनाचा 4 हजार 557 रुपये किंमतीचा भगर व भगरपीठाचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ग्राहकांनीही मिठाई व इतर दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर खावून संपवावेत किंवा रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमानास साठवावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!