कुरवली येथे नदीजवळ कपडे धुण्यासाठी घाट करण्याची महिलांची मागणी

दर्पण न्यूज कुरवली :-
कुरवली ता.इंदापूर गावातील नागरिक तसेच महिलांना कपडे धुण्यासाठी योग्य सोय नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. गावालगतून वाहणारी निरा नदी हीच मुख्य पाण्याची सोय असून,सध्या तिथे घाट नसल्यामुळे नागरिकांना चिखलात उभे राहून कपडे धुवावे लागतात.गावातील महिला दररोज कपडे धुण्यासाठी नदीला जातात. नदीलगतच्या कपडे धुण्यासाठी असणाऱ्या जागी चिखलाची दलदल व निसरड्या दगडामुळे महिला घसरून पडल्यामुळे जखमी झाल्या आहेत.गावची स्मशानभूमी नदीलगत असल्याने अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी अपुऱ्या जागेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गावातील महिला सकाळच्या वेळी कपडे धुण्यासाठी गर्दी करतात.यावेळी पाय घसरून जखमी होण्याचे घटना वाढत आहेत.गावातील ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायतीकडे नदीकाठी कपडे धुण्यासाठी व दशक्रिया विधीसाठी पक्का घाट बांधून द्यावा, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.महिलासाठी घाट बांधल्यास गावात स्वच्छतेसह सुरक्षिततेचा प्रश्नही सुटेल असे महिलांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.कुरवली ग्रामपंचायत सरपंच राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “नदीकाठी घाट बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पुणे यांचेकडे दाखल केला असून शासन निधी मंजूर झाल्यानंतर काम तातडीने सुरू करण्यात येईल.”