राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात सादरीकरण
विविध जिल्ह्यातील १०० हून अधिक कलाकारांचा सहभाग

दर्पण न्यूज कोल्हापूर : कोल्हापूरच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या नगरीत शाही दसरा महोत्सवाने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा दिला. शाही दसरा महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या “महाराष्ट्राची लोकसंस्कृती” या विशेष कार्यक्रमाने दसरा चौकाला लोककलेच्या रंगमंचात रूपांतरित केले. कोळी नृत्य, रेला काठी नृत्य, जोगवा, दिवली नृत्य, पालखी नृत्य, काठ खेळ, वाघ्या मुरुळी आणि जागरण गोंधळ यांसारख्या पारंपरिक लोककलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ढोल-ताशांचा गजर, रंगीत वेशभूषा आणि आकर्षक सजावटीने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
या सांस्कृतिक मेजवानीत राज्याच्या कोल्हापूरसह गडचिरोली, रत्नागिरी, सातारा सांगली अशा विविध जिल्ह्यातील १०० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. ग्रामीण आणि आदिवासी कलाकारांना विशेष व्यासपीठ देत, रत्नागिरीच्या कोळी नृत्याने सागरकिनाऱ्याची लय आणि गडचिरोलीच्या रेला नृत्याने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. जोगवा आणि गोंधळाने भक्तिमय वातावरणाला सांस्कृतिक रंग चढवला. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत तरुण पिढीत लोककलांविषयी अभिमान जागवला.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सह निबंधक मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे आणि तहसीलदार करमणूक विभाग तेजस्विनी पाटील यांची उपस्थिती होती. सादरीकरण केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दसरा चौकातील हा शेवटचा सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी, महोत्सवात पुढील काळात युद्धकला प्रात्यक्षिक, रांगोळी स्पर्धा, हेरिटेज वॉक आणि शाही दसरा मिरवणूक यांसारखे रंगतदार कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा केवळ उत्सव नसून सामाजिक एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक होत आहे. या महोत्सवाने स्थानिक पर्यटनाला चालना देत महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवन, परंपरा आणि वीरशौर्याचे दर्शन घडवले. “महाराष्ट्राची लोकसंस्कृती” या कार्यक्रमाने राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे सुंदर चित्र रेखाटले आणि भावी पिढ्यांसाठी हा वारसा जपण्याचे ब्रीद पेरले.
००००००