धनगाव येथे सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ
उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार दीप्ती रिटे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे यांची उपस्थिती

सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील धनगाव येथे सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायत व रोजगार हमी योजनेअंतर्गत एका हेक्टर जागेवर १२०० बांबू वृक्षांची सामूहिक लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व हरित क्रांतीकडे टाकलेले हे पाऊल स्थानिक ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरले.
यावेळी लक्ष्मी मुक्ती योजना, सातबारा वरील एकुमे कमी करणे, वारस नोंदी, अपाक, पानंद रस्ते अशा शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभागांतर्गत येणारे आवश्यक दाखले व कागदपत्रांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार दीप्ती रिटे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन व जमीन विकास याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.