महिलांना सुरक्षा, न्याय व विश्वास देणारे पोलीस प्रशासनाचे कवच
भरोसा सेल हेल्पलाइन क्रमांक ११२

दर्पण न्यूज सांगली :– “कोमल है, कमजोर नही तू, शक्ती का नाम ही नारी आहे”, हा विश्वास देतानाच, महिलांचे संरक्षण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रोत्साहनातून व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग, तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरण आणि महिला व बालविकास विभाग यांच्या परस्पर समन्वयाने योजना राबवल्या जात आहेत. निर्भया पथक, पोलीस काका/पोलीस दीदी, दक्षता समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदेशीर सेवा तसेच मनोधैर्य योजना अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार रोखणे, मुला-मुलींना सुरक्षित वातावरण देणे, तसेच समाजात कायद्याबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे.
1) भरोसा सेल
महिलांवरील हिंसाचार, लैंगिक अत्याचार व छेडछाड, कौटुंबिक वाद तसेच बालकांवरील गुन्ह्यांवर तात्काळ मदत देऊन निवारण करण्यासाठी भरोसा सेल कार्यरत आहे. पोलीस विभाग तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. भरोसा सेलमध्ये महिला व मुलांसाठी स्वतंत्र कक्षाद्वारे तक्रार नोंदणी, मोफत कायदेशीर सल्ला व मदत, मानसिक समुपदेशन, आवश्यकतेनुसार वैद्यकीय व फॉरेन्सिक सहाय्य, तसेच पोलीस संरक्षणाची सुविधा एका ठिकाणी उपलब्ध आहे.त्याचबरोबर पीडितांना न्याय मिळवण्यासाठी प्रक्रियेत मदत केली जाते.
राज्य व जिल्हा पातळीवर प्रत्येक ठिकाणी भरोसा सेलचे वेगळे संपर्क क्रमांक आहेत. हेल्पलाइन ११२ वरून संपर्क साधता येतो. थेट जवळच्या पोलीस स्टेशनमधूनही भरोसा सेलकडे तक्रार पाठवली जाते. सदर योजनेअंतर्गत पती -पत्नी यांची तक्रार प्राप्त करून घेवून तक्रारीवरून तडजोड करणे आणि पुन्हा दांपत्यांना एकत्र येण्यास आणि सोबत राहण्यास भरोसा दिला जातो. या योजनेअंतर्गत १७६ तक्रारींमध्ये तडजोड करण्यात आली आहे.
2) निर्भया पथक
निर्भया पथक हे पोलिसांचे विशेष पथक आहे, जे महिला, मुली व बालिकांवरील गुन्हे, छेडछाड, लैंगिक अत्याचार आणि इतर प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी स्थापन केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बसस्थानके अशा ठिकाणी गस्त ठेवते.
या पथकाच्या माध्यमातून महिलांवरील छेडछाड, लैंगिक गुन्ह्यांचे प्रतिबंध, महिलांकडून आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे येथे महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाते. छेडछाड, धमकी, ब्लॅकमेल आदि सायबर क्राइम संबंधित तक्रारींवरही मदत केली जाते. युवती व महिलांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देण्यासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात. सांगली जिल्ह्यात सध्या १० निर्भया पथके कार्यरत असून, या पथकामार्फत बी. पी. ॲक्टनुसार केलेली कार्यवाही २५३६ असून, बी. एन. एस प्रमाणे २ केस दाखल आहेत व ४९१ प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
3) पोलीस काका/पोलीस दीदी
ही योजना मुलांचे आणि महिलांचे संरक्षण यासाठी आहे. महाराष्ट्र पोलीस विभाग (आणि इतर काही राज्ये) शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, तक्रारी ऐकणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना राबवत आहे. मुलांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सकारात्मक भावना वाढवण्याचा प्रयत्न यातून केला जातो.
मुलांच्या/महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांशी थेट संपर्क करता येतो. मार्गदर्शनामध्ये मुलांना/ विद्यार्थ्यांना तक्रार कशी करायची, कायदा काय सांगतो हे समजावले जाते. लैंगिक अत्याचार, छेडछाड, सायबर क्राईम याविषयी जागरूकता केली जाते. पोलीस काका/पोलीस दीदी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टचची माहिती देतात. या अंतर्गत १३८९ शाळेतील मुली-मुलांना माहिती देण्यात आली. शाळा/ महाविद्यालय प्रशासनाकडून त्या परिसरातील पोलीस काका/दीदी यांची नावे, नंबर मिळतात. त्यावरून संपर्क साधता येतो.
4) दक्षता समिती
प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन झालेल्या दक्षता समित्या पारदर्शक व लोकाभिमुख पोलीस प्रशासनासाठी कार्यरत आहेत. समाजातील मान्यवर व्यक्ती, महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्था प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी यांच्या सहभागातून या समित्या तक्रारींची तपासणी, FIR नोंदणीची पाहणी, चौकशी, मदत सेवा या सर्वांचा आढावा घेऊन, महिला व बालकांशी संबंधित प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करतात. ही समिती पोलीस ठाण्याच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी, तक्रारींचे निवारण करणारी व नागरिकांचा विश्वास वाढवणारी एक महत्त्वाची यंत्रणा आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या समितीचे सचिव म्हणून काम करतात, तर अध्यक्षपद सामाजिक कार्यकर्ता किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे असते.
पोलीस विभागाच्या सर्व योजनांसाठी पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली
पोलीस दलाबरोबरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून मनोधैर्य योजनेमधून महिलांचे सामाजिक, मानसशास्त्रीय, कायदेशीर समुपदेशन व कायदेशीर मदत दिली जाते.
5) मनोधैर्य योजना
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून मनोधैर्य योजनेमधून बलात्कार पीडित/लैंगिक अत्याचार/ ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला/ बालके व त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत व मानसोपचार तज्ज्ञांची सेवा दिली जाते. अशा महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय सहाय, समुपदेशन, निवास, वैद्यकीय सेवा व कायदेशीर मदत देऊन अशा हल्ल्यात बळी पडलेल्या महिला व बालकांना प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा सांगलीच्या माध्यमातून २०२४-२५ मध्ये ४३ महिलांना लाभ देण्यात आला आहे.
तसेच महिलांकरता ग्रामीण व शहरी भागात वेळोवेळी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले जाते. अशा शिबिरामध्ये महिलांचे कायदे व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत कोठे दाद मागवायची व आपला अन्याय कसा दूर करायचा याबाबत मोफत सल्ला दिला जातो. तालुका व जिल्ह्यामध्ये एकूण ८५ जनजागृती शिबिरे घेण्यात आली आहेत.
पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली बी विंग, जिल्हा न्यायालय विजयनगर सांगली. संपर्क क्रमांक ८५९१९०३६१० लँडलाईन नंबर – ०२३३-२६००९२८