सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना

दर्पण न्यूज सांगली -: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर भीमेच्या मदतीला कृष्णा धावली असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातून ५ यांत्रिक बोटी व ४५ लाईफ जॅकेटसह १५ व्यक्तींचे पथक आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे रवाना झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, लीना खरात, प्रभारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी विजय ढेरे, रफिक नदाफ, रॉयल कृष्णा बोट स्पोर्ट्स क्लबचे दत्ता पाटील आदि उपस्थित होते.
अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सीना कोळेगांव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातील अतिरीक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशा परिस्थितीत सीना नदीकाठावरील तसेच लगतच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने करमाळा, माढा, मोहोळ, अपर तहसील मंद्रूप, उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अतिरीक्त मनुष्यबळ व साहित्याची मागणी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपैकी आवश्यक त्या साधन सामुग्रीसह व पाण्याच्या खाली शोध कार्य करण्याच्या क्षमतेसह तैनात करण्यासाठी ५ यांत्रिक बोटी, सोबत १५ व्यक्तींचे पथक व ४५ लाईफ जॅकेट, ५ रिंग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
00000