मुंबई विद्यापीठातील अमानुष घटनेचा, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा – सांगलीच्या वतीने केला तीव्र निषेध
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा - सांगली यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन

दर्पण न्यूज सांगली :- मुंबई विद्यापीठ परिसरात घडलेली बौद्ध भिक्खू (भन्तेजी) यांना चिवर काढून नग्न करून मारहाण करण्याची घटना ही अमानुष, अमानवी व धर्मांध जातीयवादी प्रवृत्तीचे विद्रूप दर्शन आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण बौद्ध समाज, आंबेडकरी चळवळ व मानवतेवर प्रहार आहे. असे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत, भारतीय बौद्ध महासभा शाखा- सांगली, मा. रूपेश तामगावकर यांनी सांगितले की,
या घटनेत मानवी हक्कांचे उघड उल्लंघन झाले असून महाराष्ट्रात असहिष्णुता, जातीय तेढ व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला आहे.त्यामुळे आम्ही भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगली जिल्ह्याच्या वतीने शासनाकडे ठाम मागणी करतो की –
1. संबंधित नराधम गुन्हेगारांवर भारतीय दंड संहिता कलम 307 (खुनाचा प्रयत्न), 295 (धार्मिक भावना दुखावणे), 323, 324, 325 (शारीरिक इजा), 341, 342 (बेकायदेशीर रोखणे व कैद करणे) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत.
2. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा.
3. मुंबई विद्यापीठ परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत.
या अमानवी घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शासनास देण्यात येत आहे.
यावेळी, जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर, जिल्हा महासचिव संजय भूपाल कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे, जिल्हा सदस्य संजय भूपाल कांबळे, प्रशांत वाघमारे, किशोर आढाव, अनिल मोरे सर, संतोष कदम सर, युवराज कांबळे, डॉ. प्रमोद दिप, मोहन साबळे, पवन वाघमारे बाळासाहेब शिंदे
याचबरोबर आंबेडकरी बौद्ध समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.