आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान पंधरवड्याला सुरुवात पहिल्या दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ

 

दर्पण न्यूज मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) चालणाऱ्या या भव्य उपक्रमांतर्गत 10 लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी होऊन 1,857 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचाराला सुरूवात झाली.

मुख्यमंत्री यांची संकल्पना

संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या भव्य उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन

राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ मिळत आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग

या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्रतज्ज्ञ रुग्णालये व विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरत आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी दिलासा

नेत्ररोग उपचाराचा खर्च गोर-गरीब नागरिकांना परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.

१७ सप्टेंबर रोजी अभियानातून मिळालेला लाभ

  • अभियानात सहभागी रुग्णालयांची संख्या : 426

  • आयोजित शिबिरांची संख्या :

    128

  • शिबिरांत सहभागी एकूण रुग्णसंख्या : 15,469

  • पुढील उपचारासाठी संदर्भित रुग्ण : 717

  • मोफत चष्म्यासाठी नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या : 1,590

  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया

    पार पडलेल्या रुग्णांची संख्या : 1,857

  • इतर नेत्र विषयक शस्त्रक्रियांची संख्या (मोतीबिंदू वगळून) : 127

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून सुरू केलेले ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण आहे. या अभियानातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत नेत्रचिकीत्सा करण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. जे रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नव्हते, त्यांनाही मोफत उपचाराची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम तळागाळातील जनतेसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!