छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ; तहसिलदार दिप्ती रिठे

दर्पण न्यूज भिलवडी पलूस :-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अभियान राबविण्ात येणार आहे. या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी पलूस तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार दिप्ती रिठे यांनी केले आहे.
सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन बुधवार दि. १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. २ ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्दिष्ट जनतेच्या समस्या सोडविणे, शासकीय योजनांचा लाभ देणे आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे हे आहे. पलूस तहसीलमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येईल ज्यात गांवठाण रस्ते, घरकुल योजना आणि स्थानिक गरजांनुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असेल.
या अभियानात तहसीलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतील. ज्यात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, सर्व जातीचे प्रमाणपत्र वाटप, रस्ते सर्वेक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि अन्य सेवा प्रदान करणे यांचा समावेश आहे. हे अभियान तीन टप्प्यांत राबविले जाईल. अभियान तीन टप्प्यांमध्ये पुढीलप्रमाणे राबवावयाचे आहे.
पहिला टप्पा : दि. १७ सप्टेंबर ते दि. २२ सप्टेंबर यामध्ये गावठाण रस्ते विषयक मोहिम, गावठाण शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, हिस्सार पत्रक, वाजिब उल अर्जात नोंदी घेणे इत्यादी बाबी आहेत.
दुसरा टप्पा : २३ सप्टेंबर ते दि. २७ सप्टेंबर या उपक्रमातंर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यारीत्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे.
तिसरा टप्पाः दि. २८ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर. स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम
राबविण्यात येणार आहे .या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार पलूस यांच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पलूस तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार दिप्ती रिठे यांनी केले आहे.