ब्लॅक स्पॉटची तात्काळ दुरुस्ती करा ; जिल्हाधिकारी अमोल येडगे

दर्पण न्यूज कोल्हापूर : मुख्यमंत्री महोदय यांचा महत्वाकांक्षी दीडशे दिवसांच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अपघात कमी करणे हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. या उपक्रमांतर्गंत जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी ब्लॅक स्पॉटची निश्चिती करण्यात आली असून त्याची तात्काळ दुरुस्ती करुन अपघात कसे कमी करता येतील याचे परिवहन / पोलीस विभाग, मनपा, राज्य व राष्ट्रीय रस्ते महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात जिल्हा सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ग्रामीण भागामध्ये ज्या राज्य रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने ते काढून घ्यावे. ब्लॅक स्पॉटची पीडब्ल्यूडीने तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेवून ती गुणवत्तापूर्ण करावीत. अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसा देण्यात याव्यात. तसेच ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत जेणेकरून भविष्यात अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ही सर्व कामे दर्जेदार व्हावीत, असे सांगून एका महिन्यानंतर याचा सर्वांगीण आढावा घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर पोलीस अधीक्षक म्हणाले, जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे 52 ब्लॅक स्पॉट असून या सर्वांची पोलीस विभागाकडून पाहणी करण्यात येवून स्थान निश्चिती करण्यात आली आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी पोलीस विभागाने संबंधित विभागाला आवश्यक ती दुरुस्ती सुचविली आहे. या आढावा बैठकीसाठी सी. ए आयरेकर, बी .एल हजारे, रोहित तोंदले, नंदकुमार मोरे, विनायक रेवणकर, महेश पाटोळे, सोहम भंडारे, सुनील जाधव, नॅशनल हायवेचे जगदीश गोंडा – अमित मिश्रा, अप्पासाहेब पालवे, सत्यराज घुले, एस. व्ही. रासने, चंद्रकांत माने, संजय कदम आदी उपस्थित होते .