सातारा जेलच्या तटावरून उडी टाकुन डॅा. नागनाथअण्णांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली ; वैभव नायकवडी

दर्पण न्यूज सातारा /वाळवा -: पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी ८१ वर्षापूर्वी सातारा जेलच्या तटावरून उडी टाकली. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि आपल्या माणसांना, देशातील सर्व जनतेला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हा मोठा विचार त्यांच्या मनात होता. अण्णांनी जेल फोडून भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली. याचं स्मरण नव्या पिढीने ठेवणे महत्त्वाचे आहे. अण्णांच्या जीवन चरित्रातून आजच्या तरुणांनी देश प्रेम, शौर्य, प्रेरणा घ्यावी म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून आपण पाळतो. असे प्रतिपादन हुतात्मा शिक्षण उद्योग समूह वाळवा (जि. सांगली ) संकुलाचे प्रमुख मार्गदर्शक, हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी केले. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह ( जेल ) येथे स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र व पुष्पांजली अर्पण पुष्पांजली अर्पण केल्यानंतर बोलत होते. यावेळी सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, कारागृह प्रमुख रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील, सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक, हुतात्मा संकुलातील अनेक प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी १० वा. सातारा जेल समोर हा कार्यक्रम संपन्न झाला. वैभव नायकवडी यावेळी बोलताना पुढे म्हणाले आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकारांनी प्रयत्न केले. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला नव्या पिढीला अभिमान आहे, १० सप्टेंबर हा दिवस सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. नव्या पिढीला हा इतिहास करावा म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. या दिवसापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रति सरकार स्थापन झाले, त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. तब्बल ६४० गावांमध्ये प्रतिसरकार होते. इंग्रज सरकारच्या सत्तेपुढे हे झुकले नाही. नागनाथ अण्णांची ही चळवळ, सातारा जेल फोटो ही घटना इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे, या घटनेतून प्रेरणा घेत सर्वांनी एकजुटीने देश एकसंध ठेवला पाहिजे. देशविघातक सर्व शक्ती, अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी एक राहिले पाहिजे. सर्व क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरव सर्वांनी केला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कारागृह प्रमुख रमाकांत शेडगे म्हणाले डॉ. नागनाथ अण्णांचे शौर्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांच्या शौर्यातून आम्हाला सर्वांना प्रेरणा मिळते, परंतु हल्लीची तरुणाई मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी निघाली आहे. ही खूप चिंतेची बाब आहे. तरुण पिढीच्या वागण्याकडे पाहून आपण पारतंत्र्याकडे निघालो आहोत काय असा प्रश्न पडतो आहे. तरुण पिढी दिशाहीन झाली आहे. या तरुण पिढीने स्वातंत्र्यवीरांचे, चालू परिस्थितीचे भान राखले पाहिजे. तरुणांनी एक उत्तम नागरिक होण्यासाठी जे जे पाहिजे ते केलं पाहिजे. देश पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी तरुण पिढीवरच आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी सातारा जेल समोर असलेल्या स्मृतीस्तंबावर वैभव नायकवडी व सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकमतचे आवृत्ती प्रमुख हनमंत पाटील, प्रतिसरकार स्मारक समितीचे प्रा. विजय निकम, असलम तडसरकर, शंकर पाटील, दत्ताजी जाधव छत्रपती शिवाजी कॉलेज व कला वाणिज्य कॉलेज साताराचे अनेक प्राध्यापक, बाळासाहेब पाटील, कुमार शिंदे, दिलीप सूर्यवंशी, प्रा. राजा माळगी, विश्वास मुळीक, शिवाजी शंकर पाटील, राजाराम शिंदे, अजित वाजे, तुकाराम डवंग, नारायण कारंडे, जयकर चव्हाण, बाळासाहेब नायकवडी, श्री. बाबर, यांच्यासह सातारा शहरातील विविध चळवळीमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख मान्यवर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.