ऋषिकेश, व्यंकटेश, दिव्या, दिशा, संस्कृती आघाङीवर ;
जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा ज्युनियर (19 वर्षाखालील) मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूरः अनिल पाटील
आयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती (19 वर्षाखालील ज्युनिअर मुला-मुलींची) निवड बुद्धिबळ स्पर्धा आज प्रारंभ झाल्या.या स्पर्धेत इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल वारणानगर व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 80 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. यापैकी 30 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन डकरे-अंतुरकर असोसिएटचे चार्टर्ड अकाउंटंट सतीश डकरे, तुषार अंतुरकर व धनश्री अंतरकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी भरत चौगुले, मनीष मारुलकर,धीरज वैद्य,प्रशांत पिसे व नमिता म्हेतर- केसरकर इ.उपस्थित होते. जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात स्विस् लीग पद्धतीने एकूण सहा फेर्यात या स्पर्धा होणार आहेत. आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर व सहावा मानांकित व्यंकटेश खाडे पाटील हे दोघेजण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. द्वितीय मानांकित अरीन कुलकर्णी व पाचवा मानांकित श्रेयस गाताडे हे दोघेजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. मुलींच्या गटात अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित जयसिंगपूरचीच दिशा पाटील दिशा पाटील व चौथी मानांकित नांदणीची संस्कृती सुतार या तिघीजणी साडेतीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. कोल्हापूरची सृष्टी जोशीराव,जयसिंगपूरची श्रेया दाइंगडे व कोल्हापूरची स्नेहल गावडे या तिघीजणी तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.