आपत्तीतील हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज सांगली- : संभाव्य आपत्तीत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या. शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याबरोबर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मान्सून कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल, पोलीस, पाटबंधारे, आरोग्य, बांधकाम, विद्युत विभाग, जिल्हा परिषद व प्रसारमाध्यमे यांचा योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा व तालुका स्तरावर करावयाच्या तात्काळ उपाययोजना संबंधित विभागांनी कराव्यात. नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. प्रशिक्षित बचाव पथके, होडी/यांत्रिक बोटी, पोहणारे आदि स्थानिक साधनसामग्रीची उपलब्धता तपासावी. आवश्यक जादा यांत्रिक बोटीसाठी मागणी करावी. संभाव्य पूर, दरड कोसळणे व आपत्ती निवारण कामी यंत्रणांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषतः पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग असणे आवश्यक आहे. यासाठी अशा रस्त्यांचे आराखडे तयार करावेत, अशा त्यांनी यावेळी दिल्या.
शिराळा तालुक्यातील काही गावांमध्ये पूरपरिस्थिती आणि आपत्तीजनक स्थिती आहे. मात्र सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सतर्क व दक्ष राहावे, असे सूचित करून आमदार सत्यजीत देशमुख म्हणाले, आपत्तीच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजना उपलब्ध करून ठेवाव्यात. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. गरोदर मातांची विशेष काळजी घेऊन लहान बालकांचे लसीकरण करावे. गावात औषध फवारणी करावी. तात्पुरत्या निवारा केंद्रांची पहाणी करून या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात. कृषी विभागाने तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या क्षेत्राचा आढावा घ्यावा. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा. पाटबंधारे विभागाने काटेकोर नियोजन करावे.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची माहिती दिली. तसेच करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
00000