सांगली महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

दर्पण न्यूज सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी 28 जुलै 2025 ते 11 ऑगस्ट 2025 या कालावधीसाठी सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्वावर प्रसिध्द केला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३३ पोटकलम १ (ब) रहदारी अधिकारान्वये प्रायोगिक तत्वावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार एकेरी वाहतुक मार्ग पुढीलप्रमाणे – फुलारी कॉर्नर ते दत्त चौक – फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करण्यात येत आहे. दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल.
किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान ते महाराणा प्रताप चौकापर्यंत एकेरी मार्ग (वन वे) करण्यात येत आहे. दुचाकी वाहनांखेरीज सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान मिरज येथून दुचाकी वाहनांखेरीज येणाऱ्या वाहनांसाठी न्यायाधीश निवासस्थानापासून डावीकडे पश्चिमेस वळण घेऊन जवाहर चौक मार्गे किसान चौक मार्गे वळविण्यात येत आहे.
नागरिक, रहिवाशी, मोटार वाहन चालकांनी व जनतेने बदल केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. याबाबत हरकती, सूचना असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियत्रंण शाखा, मिरज किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगली यांच्याकडे लेखी स्वरुपात पाठवाव्यात, जेणेकरून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.